महाविकास आघाडीचे १७० पर्यंत उमेदवार निवडून येणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह या दोघांच्या जास्त सभा झाल्या, तर आमचे दोनशेच्या पुढे आमदार निवडून येतील आणि मतदार व्याजासकट तुम्हाला उत्तर देतील असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
विधानसभेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत- जामखेड मतदारसंघातील जामखेड येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पवार यांची प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनी माझी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना विनंती आहे, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जास्तीत जास्त सभा लावाव्यात असेही ते म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रात येऊन प्रश्न विचारतात की कृषिमंत्री असताना शरद पवारांनी काय केले? लोकसभेला अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन विचारला होता. त्यावेळी लोकशाहीच्या मार्गाने महाराष्ट्रातील लोकांनी उत्तर दिले आणि महायुतीचे २३ खासदारांवरून थेट नऊ खासदारांपर्यंत आकडा आला.
आता पुन्हा अमित शहा महाराष्ट्रात येऊन शरद पवारांनी काय केले? हा प्रश्न विचारत आहे. यामुळे आमच्या आमदारांची संख्या नक्की वाढेल असा दावा त्यांनी केला आहे.