इराण-अमेरिका, इस्रायल युद्धाचे परिणाम देशासह महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. मध्यपूर्वेतून होणारा ऊर्जा पुरवठा थांबल्यामुळे एलपीजी गॅसच्या पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले असून राज्यातील अनेक भागात गॅसचा तुटवडा जाणवत आहे. केंद्र सरकारनेही ५ मार्चला अधिसूचना काढून व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर निर्बंध आणले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांसह राज्यातील अनेक शहरांमध्ये हॉटेल व्यावसायिकांना फटका बसला. सिलिंडर मिळण्यास विलंब होत असल्याने आणि भीतीमुळे नागिकांनी गॅस पुरवठा केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. यावरून विरोधक राज्य आणि केंद्र सरकारवर टीका करत आहेत.
नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारावा : संजय राऊत
पंतप्रधान मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी फार वर्षांपूर्वी एक शोध लावला होता, नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल. मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशा प्रकारचा प्रकल्प मोदींच्या संकल्पनेतून निर्माण करता येईल का? त्याचे उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदी यांनाच बोलवावे. त्यामधून प्रेरणा घेऊन देशभरात असे अनेक उद्योग निर्माण होतील, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
आखाती देशांमधील युद्धामुळे गॅसची जी टंचाई निर्माण झाली आहे, ती आम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या कृपेने दूर करता येईल. परंतु, पहिले उद्घाटन त्यांनी मुंबईतील मिठी नदीवर करावे. त्यासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था आम्ही करायला तयार आहोत. तसेच या प्रकल्पासाठी कोणतेही अनुदान लागले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करावे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, देशात गॅसची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. सरकारकडून सांगण्यात आले होते की, या युद्धाचा कोणताही परिणाम होणार नाही. पण सरकारने जनतेला दिलेले हे आश्वासन फोल ठरले. मुंबईसारख्या शहरात गॅस टंचाईमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद आहेत. व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाल्याने वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा आणि सांगली येथील इंजिनिअरिंग उद्योग पूर्णपणे बंद आहेत. चाकण वाहन उद्योग अडचणीत आला आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.