काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच भारत- पाकिस्तान या दोन्ही देशातील राजनैतिक तणाव दिवसागणिक आणखी वाढत चालला आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथील बैसरन येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झालाय. तेव्हापासून, केवळ देशातूनच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
या हल्ल्यानंतर भारत सरकारनेही पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आणि सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले.
यादरम्यान, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी चे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी आक्रमक आणि चिथावणीखोर विधाने करून ही परिस्थिती अधिक गंभीर केली आहे.
एका जाहीर सभेला संबोधित करताना बिलावल भुट्टो यांनी सिंधू पाणी कराराबाबत भारताला थेट धमकी दिली. ते म्हणाले, "मला सिंधू नदीच्या काठावर उभे राहून भारताला सांगायचे आहे की सिंधू आमची आहे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचे पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल."
हे विधान भारताविरुद्ध हिंसाचाराला उघडपणे चिथावणी देणारे म्हणून पाहिले जात आहे, विशेषतः अशा वेळी जेव्हा पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशाला दुःखांच्या सागरात लोटले असताना आणि जगभरात संतापाची लाट असताना असे वक्तव्य पाकिस्तानच्या नक्कीच अंगलट येईल, असे बोलेल जात आहे.
सिंधू पाणी कराराला भारताकडून स्थगिती
भारताने 1960च्या जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेल्या सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा करार भारत आणि पाकिस्तानमधील पाणीवाटपाबाबतचा एक ऐतिहासिक करार आहे, जो दोन युद्धांमध्येही अबाधित राहिला. परंतु सततच्या दहशतवादी कारवाया आणि पाकिस्तानच्या असहकार्य भूमिकेमुळे भारताने आता ते पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.