डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आरोप करत भारताला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. रशियाकडून सुरू असलेल्या तेल खरेदीमुळे आता वाद चिघळण्याची शक्यता आहे. भारत रशियाकडून स्वस्त दरात मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल खरेदी करून, ते आंतरराष्ट्रीय बाजारात महाग विकतो आणि मोठा नफा कमावतो असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारताला रशिया-युक्रेन युद्धात होणाऱ्या मानवी नुकसानीची पर्वा नाही. त्यामुळे भारतावर पुन्हा एकदा अतिरिक्त टॅरिफ लावण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीवर आक्षेप घेतला आहे. या खरेदीचा फायदा थेट मॉस्कोच्या युद्धयंत्रणेला होतो असे ते म्हणाले. मात्र, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी स्पष्ट केले की, "भारत आपल्या ऊर्जा गरजा जागतिक परिस्थिती आणि उपलब्धतेनुसार ठरवतो. आमचे निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय गरजा आणि स्वावलंबन यावर आधारित असतात."
भारतावर लादण्यात आलेला टॅरिफ फक्त व्यापार संबंधावरच नव्हे, तर जागतिक राजकारणावरही परिणाम करू शकतो. ज्यामुळे जागतिक स्तरावर दोन गट पडण्याची शक्यता आहे. अमेरिका आणि भारत या दोन महत्त्वाच्या भागीदार देशांमध्ये निर्माण होणारे हे तणाव भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे.