बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान शुटींग दरम्यान जखमी झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. ‘किंग’ या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक अॅक्शन सीन करताना शाहरुखला दुखापत झाली आहे. त्याला दुखापत स्नायूंच्या ताणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.
हा अपघात झाला तेव्हा अभिनेता मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये शूटिंग करत होता. आता शाहरूख खान हा उपचारांसाठी अमेरिकेत गेला आहे.डॉक्टरांनी त्याला किमान एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
एका वृत्तानुसार असं सांगण्यात आलं आहे की, या अपघाताची अचूक माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे, परंतु शाहरुख आणि त्याची टीम उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली आहे ही पक्की माहिती समोर आली आहे. शाहरूखला झालेली दुखापत गंभीर नसल्याचं म्हटलं जात आहे. परंतु ही दुखापत त्याच्या स्नायूंना झाली आहे. स्टंट करताना शाहरुख खानच्या स्नायूंना यापूर्वीही अनेक वेळा दुखापत झाली आहे. मात्र यावेळी झालेली दुखापतीवर उपचार घेण्यासाठी शाहरूख आणि त्याची टीम ही अमेरिकेला रवाना झाली आहे.
चित्रपटासाठी फिल्म सिटी, गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि यशराज स्टुडिओ जुलै आणि ऑगस्टसाठी बुक करण्यात आले होते, परंतु आता ते वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. आता चित्रपटाचे पुढील वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
त्याच वेळी, अशी बातमी आहे की दुखापतीमुळे शाहरुख खानला बेड रेस्टचा सल्ला देण्यात आला आहे, ज्यामुळे तो सध्या शूटिंग करू शकणार नाही. तसेच एका सूत्रानुसार “या महिन्याच्या सुरुवातीला देखील शाहरुख उपचारासाठी गेला होता आणि त्याच्या खांद्याच्या स्नायूंच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत.”
‘किंग’ ची स्टारकास्ट आणि रिलीज डेट
शाहरुख खानची मुलगी सुहाना खानही त्याच्या या चित्रपटात दिसणार आहे. तिच्याशिवाय अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, दीपिका पदुकोण, अर्शद वारसी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि सौरभ शुक्ला यांसारखे स्टार्स देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांनी ‘किंग’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नसली तरी, हा चित्रपट 2026 मध्ये चित्रपटगृहात दाखल होऊ शकतो असे मानले जाते.