विधिमंडळात नाशिकचं हनी ट्रॅप प्रकरण चांगलंच गाजलं. यात बड्या अधिकाऱ्यांसह नेत्यांचाही सहभाग असल्याची चर्चा होत होती. या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्रासंबंधी खासगी दस्तऐवज लीक झाल्यास महाराष्ट्राला गंभीर परिणाम भोगावा लागू शकतो असा ठपका ठेवत विधिमंडळात चांगलाच गदारोळ पहायला मिळाला. यावर ना हनी, ना ट्रॅप असे कुठलेही प्रकरण नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हनी ट्रॅप प्रकरणासंबंधी होणारे आरोप फेटाळून लावले होते.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक्सवर मंत्री गिरीश महाजन यांचा एक फोटो पोस्ट करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या चौकशीतून सत्य उजेडात येईल आणि कोण खरे, कोण खोटे हे स्पष्ट होईल, असे राऊतांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहेत. संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वातावरण तापले आहे. याशिवाय शिवसेनेतून फुटलेल्या शिंदे गटात सामील झालेल्या काही तरुण खासदारांनाही 'हनी ट्रॅप'मुळे पक्ष सोडावा लागल्याचा दावा राऊतांनी केला आहे.
आता जळगावातील भाजपा नेत्याचा निकटवर्तीय असलेल्या प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. जळगावच्या पहूर येथील प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबई येथील साकीनाका व अंधेरी पोलिस ठाण्यात हनी ट्रॅप, पॉक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे म्हणाले की, प्रफुल्ल लोढा हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटचे कार्यकर्ते आहेत. काही वर्षांपूर्वी लोढा यांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यानंतर काय चमत्कार झाला कुणास ठाऊक, लोढा हे अचानक कोट्यवधींचे मालक झाले.
संजय राऊत यांनी केलेला दावा आणि प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्यानंतर चौकशीअंती अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. ही नावे समोर आल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो.