महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 132 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी आता महायुतीत जाण्याची चाचपणी सुरू केल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एका पदाधिकाऱ्याने भाजप नेत्यांची भेट घेऊन प्रवेशाची तयारी दाखवल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला
या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने जलसंपदा मंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देतानाच या पदाधिकाऱ्याने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, स्थानिक आमदारांच्या व माजी नगरसेवकांच्या विरोधानंतर कोणाचाही प्रवेश होणार नसल्याचे प्रदेश पातळीवरील नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात महायुतीचा मोठा विजय झाल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील 15 मतदारसंघांपैकी तब्बल 14 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही विधानसभा निवडणुकीसारखेच चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतील काही पदाधिकारी महायुतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असून आता महाविकास आघाडीतील पदाधिकारी महायुतीत प्रवेश करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.