नाशिक (प्रतिनिधी) :- ठाकरे गट शिवसेनेकडून एका जागेसाठी 10 उमेदवार इच्छुक असल्याचा प्रचार करीत आहेत. त्यातून एक उमेदवार अंतिम ठरवू, अशी माहिती शिवसेना खा. संजय राऊत यांनी दिली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान देताना सांगितले, की आता आमच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह सर्वजण पक्ष प्रवेश करणार असल्याची घोषणा त्यांनी करावी म्हणजे त्यांचे समाधान होईल, असा टोला खा. राऊत यांनी ना. फडणवीस यांना लगावला.
खा. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून, त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, विजय करंजकर, वसंत गिते, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुनील गोडसे, राजेंद्र वाकसरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी केले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना खा. संजय राऊत म्हणाले, की यावेळी भाजपा जरी 400 खासदार निवडून येण्याचा दावा करीत असला तरी ते शक्य वाटत नाही, असा दावा करून राऊत म्हणाले, की महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत आणि ते असल्याचे खोटे चित्र रंगविले जात आहे हे अत्यंत चुकीचे आहे. महाविकास आघाडीमधील जागावाटप हे अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच त्याची घोषणा केली जाईल.
काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांचे जोरदार स्वागत केले जाणार आहे, राहुल गांधी यांच्या सभेला 17 मार्च रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हजर राहणार आहेत, असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, की रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चालू असलेल्या कारवाईला पूर्णविराम मिळालेला आहे. ‘आता त्यांना अटक करू,' असे म्हणणाऱ्यांनी सांगावे की उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह सर्वजण पक्षप्रवेश करीत आहेत. म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल.