राज्यातील राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली असून आता शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गोटातून मोठी माहिती समोर येत आहे. या माहितीनुसार उद्धव ठाकरे गटाला आता एक मोठा धक्का बसणायची शक्यता असल्याचं चिन्ह दिसतंय.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. नागेश पाटील आष्टीकर हे शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन या निवासस्थानी पोहोचले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेत ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे.
हिंगोलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. स्थानिक विकास कामांसंदर्भात ही भेट घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या भेटीमागील कारण वेगळंच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या भेटीबाबत आष्टीकर काही खुलासा करणार का याकडेही सर्वांचे लक्ष असणार आहे.
गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली होती. या 6 खासदारांचा पक्षप्रवेशही वरिष्ठांच्या परवानगीनंतर होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी असा कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, तसेच ऑपरेशन टायगर सक्रीय नसल्याची माहिती दिली होती. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. मात्र आता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे.