गिरीश महाजन यांच्यावरील टीका खासदार राऊतांना भोवली, 'याठिकाणी' गुन्हा दाखल
Vaishnavi Sangale
दैनिक भ्रमर (प्रतिनिधी) : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर वैयक्तीक स्वरुपाचे विधान केल्याने त्यांच्याविरोधात नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदगावचे भाजप मंडल अध्यक्ष संजय सानप यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीवर राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यासह भारतीय जनता पक्षाविरुद्ध अपशब्द वापरून गिरीश महाजन यांची जनसामान्यांमध्ये प्रतिमा मलिन होईल, असे वक्तव्य राऊत यांनी केल्याचा उल्लेख या फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी राऊत यांनी गिरीश महाजन यांची जाहीर माफी मागावी, तसेच या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सानप यांनी केली.
या प्रकरणात योग्य कायदेशीर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतलून तीव्र आंदोलन करतील आणि राऊत यांच्या विधानाचा राज्यभर निषेध करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगाव पोलिसांना निवेदन देखील दिले आहे.