एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. खडसे म्हणाले, मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं…एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या सवयीवर चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे
गिरीश महाजन हा माणूस नुसते बडबड करणारा आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांना भाव देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण आहे? हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणतात, भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. परंतु आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री होतो. त्यामुळे मला तेवढी अक्कल होती. गिरीश महाजन यांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.
आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी तुमच्या आमदाराची आहे. काय करतोय तुमचा आमदार? असा प्रश्न उपस्थित करत आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी घेरले. तुमच्या आमदारानेच बोदवडमध्ये पाणी दिले नाही. ते म्हणतात, कोथळी ग्रामपंचायतीचा सरपंच तुमचा नाही. तर घ्या त्या सरपंचाची प्रतिक्रिया अन् विचारा त्यांना कुणाचा सरपंच आहे, असे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले.