सोशल मीडियाचा योग्य वापर आणि नागरिकांचे धाडस या काही कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक भोंदूबाबा समोर येत आहे. नाशिकसह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या अशोक खरात प्रकरणानंतर तर अनेक भोंदूबाबा आणि त्यांचे दुष्कृत्य समोर आले आहेत. मुंबईत देखील आता एका भोंदूबाबाविरोधात तक्रार झाली आहे. भूत उतरवण्याची बतावणी करत मुंबईच्या मालाड भागातील भोंदूबाबा दर गुरूवारी आणि रविवारी अघोरी पूजा करतो.
आतापर्यंत तो त्याच्या घरी, घराच्या समोर अशा प्रकारच्या पूजा किंवा अशा प्रकारचे प्रताप करत होता. मात्र 4 एप्रिलला तर हद्दच झाली. त्याने चक्क महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना बोलून आपली पूजा करत उघडपणे भूत उतरण्याच्या नावाखाली जादूटोण्याचा प्रकार केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्याचे काही फोटोज व्हिडिओ सुद्धा आता समाज माध्यमांमध्ये आले आहेत.
भोंदूबाबा त्याच्या पूजा साहित्यात बकऱ्याचा कलेजा, काळं कापड, लाल कापड, स्मशानातली राख, लिंबू, टाचणी, दारूची बाटली, कुंकू, सिगरेट अशा वस्तू घेतो. चार रस्ते जिथे मिळतात तिथे तो पूजा झाल्यावर या वस्तू फेकत असे. जादुटोण्याच्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये विशेषतः महिला, मुलांमध्ये घबराटीचं वातावरण होतं. मात्र एवढे प्रकार सुरू असूनही पोलिसांचं या रिदम पांचाळ नावाच्या भोंदूबाबाकडे दुर्लक्ष का असा सवाल उपस्थित झाला आहे.
भोंदूबाबाचा सदर सगळा प्रकार, ह्या अघोरी विद्याचे व्हिडिओ या स्थानिकांनी दोन आठवड्यापूर्वीच पोलिसांना दिले आणि स्थानिकांनी सह्या करत यावर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली. कारण त्याच्या या आघोरी पूजेमुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण आहे. वारंवार सांगून सुद्धा तो आपला हा कार्यक्रम थांबवत नसल्याने स्थानिकांना पोलिसांमध्ये धाव घ्यावी लागली. ही एक प्रकारे देवीची पूजा असल्याचं हा भोंदूबाबा त्याला या सगळ्या आरोपावर प्रश्न विचारल्यावर सांगतो.
पूजेचे साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा या पूजेची भीती वाटेल आणि हा एक प्रकारे ब्लॅक मॅजिकचाच म्हणजेच जादूटोण्याचा प्रकार आहे हे तुमच्या लक्षात येईल. मात्र अशाप्रकारे राजरोसपणे सुरू असताना पोलिसांचे याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, यावर आता पोलीस नेमकी काय कारवाई करतात? हे पहावं लागेल.