बापानेच केलं १६ वर्षांच्या मुलीचं टक्कल; वाचा
बापानेच केलं १६ वर्षांच्या मुलीचं टक्कल; वाचा "कुठे"आणि "का" घडली हि घटना
img
Jayshri Rajesh

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरूड परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी आणि पालकांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या वयात आलेल्या मुलीवर कोणीही वाईट किंवा वाकडी नजर टाकू नये, या अजब समजुतीतून जन्मदात्या आई-वडिलांनीच स्वतःच्या १६ वर्षांच्या मुलीचे घरातच ट्रिमरने टक्कल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अमानुष छळाला आणि बंधनांना कंटाळून अल्पवयीन मुलीने स्वतः पोलीस ठाणे गाठल्यामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.



मुलीवर तक्रार देण्यासाठी दबाव

पीडित मुलगी तिच्या आई आणि वडिलांसोबत राहते. काही दिवसांपासून परिसरातील एक मुलगा तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहत असल्याचा संशय पालकांना होता. या कारणावरून पालकांनी मुलीवर सतत दबाव आणून तिला त्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्यास सांगितले होते. मात्र, मुलीने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास स्पष्ट नकार दिला.

घरातच मुलीला केले विद्रुप

मुलीने आपले म्हणणे ऐकले नाही या रागातून आणि तिच्या सौंदर्यामुळे मुले तिच्याकडे आकर्षित होतात या अजब मानसिकतेतून पालकांनी घरातच तिचे केस कापण्याचा कट रचला. १५ एप्रिल रोजी दुपारी पालकांनी घरातच ट्रिमर मशीन लावून तिचे संपूर्ण केस कापून तिला विद्रुप केले. तिने या अघोरी प्रकाराला जोरदार विरोध केला असता, तिला जबर मारहाण करून घरातच डांबून ठेवण्यात आले.

मुलीचे धाडस आणि पोलीस तक्रार

स्वतःच्याच आई-वडिलांच्या या अमानुष आणि विकृत वागणुकीमुळे ही सोळा वर्षांची मुलगी प्रचंड घाबरली. जन्मदाते पुढे आपले काहीतरी बरेवाईट करतील, या भीतीने तिने हिंमत करून थेट वरूड पोलीस ठाणे गाठले आणि आपल्यावर बेतलेली सर्व आपबिती पोलिसांसमोर कथन केली. मुलीचे टक्कल केलेले पाहून पोलीस अधिकारीही सुरुवातीला चक्रावून गेले.

बाल कल्याण समितीसमोर हजर आणि गुन्हा दाखल

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत वरूड पोलिसांनी १६ एप्रिल रोजी पीडितेला बाल कल्याण समितीसमोर (CWC) हजर केले. तिथेही तिने तिच्यावर झालेला अत्याचार समितीच्या सदस्यांना सांगितला. वरूडचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या आई आणि वडिलांविरुद्ध बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलीची शासकीय निरीक्षणगृहात रवानगी

तिच्या सुरक्षेचा विचार करून आणि तिच्याच मागणीनुसार पोलिसांनी तिची रवानगी सध्या शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात केली आहे. मुलीचे समुपदेशन आणि पुनर्वसन करण्याचे काम सध्या सुरू असून, वरुड पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत. पालकांच्या अशा टोकाच्या आणि विकृत पावलामुळे संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group