राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना, जळगाव, परभणी, धुळे, पुणे, नांदेड, बीड, सोलापूर आणि बुलढाणा या जिल्ह्यांत पावसाने अक्षरशः तांडव केले. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तर दुसरीकडे अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जालना, सातारा, राहाता , नांदेड या ठिकाणी पावसाने झोडपून तर काढलचं, पण वीज पडून काही ठिकाणी कोणी कुटुंबातील सदस्य गमावले तर कोणी कुटुंबातील सदस्याप्रमाणे असणारे जनावरे गमावली आहेत. खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण, जांभळी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.विशेषतः बडेवाडी शिवारात गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका तसेच आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ हा पाऊस सुरू होता. दरम्यान मालेवाडी येथे शेतात काम करत असताना वीज कोसळून शेतकरी शिवाजी खेडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
बीड जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात वीज कोसळून एका बैलाचा मृत्यू झाला. जालना – अवकाळी पावसात वीज कोसळून दोन तरुण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झालाय. अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तरुण अवकाळी पावसात लिंबाच्या झाडाखाली थांबले असता लिंबाच्या झाडावर वीज कोसळून दोन तरुण ठार एक जण गंभीर भाजला आहे. ही घटना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती या ठिकाणी घडली. गोविंद लहाने आणि आदित्य बेद्रे अशी वीज पडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत.
सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला असून खंडाळा तालुक्यात महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कराडवाडी येथील सोनाली अजित कराडे २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, त्या शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं. राहाता येथे वादळाने विजेची तार कोसळली आणि 9 गाईंचा मृत्यू झाला. राहता तालुक्यातील पाथरे गावातील घटना घडली असून काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून संजय घोलप यांच्या गोठ्यातील नऊ गाई मृत्यूमुखी पडल्या.
नांदेड जिल्ह्यात वादळी वऱ्यांसह विजाच्या कडकडाटात पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यातील लहान गावातील शेतकरी विठ्ठल नारायण कुदेवार यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेल्या गाईवर रात्री वीज कोसळून गाईचा मृत्यू झाला. दुभत्या गाईचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
गेवराई तालुक्यातील उमापुर येथे वीज पडून 2 बैलांचा मृत्यू झालाय.
सातारा शहरासह वाई, जावळी,खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. डाळा तालुक्यातील मोर्वे गावात वीज कोसळल्याने मेंढपाळ अमोल गोपाळ धायगुडे यांच्या 8 शेळ्या आणि 1 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. वाई तालुक्यातील पांडवनगर (आसले) येथे झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या 15मेंढ्यांवर वीज कोसळली. या घटनेत लाखो रुपयांचे पशुधन दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.