राज्यात पुन्हा एकादा मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्यासाठी पौषक वातावरण तयार होत आहे. तर आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर, सांगली याठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव या जिल्ह्यांत देखील अशाच पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण आणि ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांनी म्यानमारजवळ बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची चिंता व्यक्त केली आहे. दिल्ली-एनसीआरच्या आसपास एक प्रणाली विकसित होत आहे. यामुळे पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव निर्माण होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो. मध्य प्रदेशवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्यामुळे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात पाऊस तुफान पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने असे देखील सांगितले की, छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र आता पूर्णत: कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरित झाले आहेत. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंड आणि आंध्र प्रदेशमध्ये हवामान पुन्हा बदलू शकते.