कुठे गारपीट तर कुठे मुसळधार , राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'
कुठे गारपीट तर कुठे मुसळधार , राज्यात 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट'
img
वैष्णवी सांगळे
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ होत असतानाच, आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याच्या अनेक भागांत पावसाची हजेरी लागणार असून, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, १७ ते २० मार्च या कालावधीत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बुधवारी (१८ मार्च) अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव आणि लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर), सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.१८ मार्चपासून मुंबईसह कोकणात हलक्या सरी कोसळू शकतात. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या उत्तर कोकण पट्ट्यासह नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या १३ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता कायम राहील. रात्रीच्या वेळी दमट हवामानामुळे उकाडा वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात एकाच वेळी उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट उभे ठाकले आहे. याचा मोठा फटका काढणीला आलेल्या पिकांना आणि फळबागांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत. तसेच नागरिकांनी बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group