दैनिक भ्रमर : राज्यात थैमान घालणारा पाऊस आता जीवावर उठला आहे.राज्यात पावसाचे ७ बळी आतापर्यंत गेले आहेत. तर मराठवाड्यातील ११ जण बेपत्ता आहे. राज्यात सोमवारपासून अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. भरतीच्यावेळी झालेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले.
या मुसळधार पावसामुळे मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर, भूस्खलन आणि अपघातांमुळे आतापर्यंत मुंबईत १, मराठवाड्यात ४ तर विदर्भात २ जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात तब्बल ११ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, नांदेडमध्ये लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून, लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नऊ गावांमध्ये पाणी शिरले आहे.
एनडीआरएफ टीमकडून गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चिखली तालुक्यात मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर मुंबईतदेखील सरकारी तसेच खासगी ऑफिस बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास वर्क फ्रॉमचा होमचा पर्याय अवलंबवावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.