मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात बदल पहायला मिळत आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर नागपुरात वादळी पावसाने अचानक हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला; मात्र सोबतच वाऱ्याच्या जोरदार झोतांमुळे शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला.
हवामान विभागाने सुरुवातीला पावसाचा अंदाज केवळ गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांपुरता वर्तवला होता. रविवारी संध्याकाळपर्यंत या अंदाजाची व्याप्ती वाढवत यवतमाळपर्यंत वादळी पावसाची शक्यता दर्शविण्यात आली. नागपुरात मात्र केवळ ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज होता. तथापि, मध्यरात्रीनंतर अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाची सर कोसळली.
वादळी पावसाचा इशारा कुठे कुठे?
दरम्यान हवामान विभागाने आज आणि उद्या देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी केला आहे. मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव यांसह विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर व निफाड परिसरातही ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.