कडाक्याच्या उन्हा नंतर आता सर्वांना थंडाव्याची आस लागली असून सर्वच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. केरळ मध्ये जरी पावसाने एन्ट्री केली असली तर आता मात्र महाराष्ट्रावर संकटाचं सावट निर्माण झालं असल्याची अपडेट आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून 2-3 दिवसांत महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. अशातच राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे धुमशान सुरू आहे. कोकण ते विदर्भ विविध जिल्ह्यांत वादळी वारा आणि विजांसह पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहील. आज 24 जिल्ह्यांना यलो तर 3 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
कोकण विभागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा वाढला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही आज पुन्हा पावसाचा अलर्ट आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांसाठीही यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह अनेक शहरांमध्ये दिवसा ढगाळ वातावरण आणि दमट उष्णता जाणवत असली तरी मान्सूनच्या आगमनामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल जाणवत असून तापमानात एक ते दोन अंशांची घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांमध्ये तुरळक ते हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. तर लातूर, धाराशिव परिसरात ताशी 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पावसाचा अलर्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातही वातावरण बदलल्याचे चित्र आहे. धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांमध्ये तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात बदल जाणवत आहे.
विदर्भावर दुहेरी संकट कायम आहे. काही भागांमध्ये कमाल तापमान अद्याप 38 ते 43 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. त्यामुळे उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. तर मान्सूनपूर्व पाऊस देखील धुमाकूळ घालत आहे. आज अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट असेल. या काळात ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहतील.
एकंदरीत केरळात मान्सून दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. तर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर असून आज महाराष्ट्रातील सर्वच भागात वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती खबरदारी घ्यावी लागेल. येत्या चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.