राज्यातील 'या' जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले, शेतीपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
राज्यातील 'या' जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले, शेतीपिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल
img
वैष्णवी सांगळे
राज्यातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. गेल्या दोन दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसला, त्यासोबतच गारपीटही झाली.या अस्मानी संकटामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही ठिकाणी शेतीची कामे वेगाने सुरू होती. धान्य खळ्यावर होतं. तर काही ठिकाणी गव्हाची कापणी सुरू होती. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा रडवले आहे. राज्यात अनेक ठिकाणी गारांसह पाऊस पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.



राज्यात अस्मानी संकट कुठे ? 
बीड - बीडच्या केज तालुक्यातील डोंगर पट्ट्यामध्ये झालेल्या गारपीटीचे विदारक दृश्य समोर आले आहे. बीडच्या कोरडेवाडी, तुकुचीवाडी आणि घाटेवाडी भागात काल झालेल्या गारपीटी नंतर तब्बल दोन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून आले.या गारपीटी मुळे गहू, ज्वारी आंबा, आणि भाजीपाल्याचं नुकसान झालं असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेला आहे. जिल्ह्यातील वडवणी आणि केज या दोन तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाऱ्यासह गारांचा दमदार पाऊस झाला. यामध्ये दोन्ही तालुक्यातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. 

सोलापुर - सोलापुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी येथील शेतकरी अंकुश सिरसट यांची तब्बल तीन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली आहे. या घटनेत जवळपास 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाले. 

जालना  - जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपीट झाली. तर आडगाव भोंबे, वडोद तांगडा, जळकी बाजार, हिसोडा, दहिगाव, आणि परिसरातील इतर गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा पिकासह इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 

यवतमाळ - हवामान खात्याच्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात माळ पठार भागात अचानक वातावरणात बदल होऊन जोरदार पावसासह गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली असून रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दुपारनंतर वाऱ्याचा वेग वाढत आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच गारांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. या गारपिटीमुळे हरभरा, गहू तसेच इतर पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे. 

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील जागमाथा आणि काकडदाती फाट्यावर अवकाळी पावसाचा फटका मुर्तीकार बांधवांना बसला आहे. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे तयार करण्यात येत असलेल्या मुर्त्या भिजल्या असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यात आज काही ठिकाणी अचानक हवामानात बदल होत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून काही भागात गारपीटही नोंदवली गेली आहे. काढणीला आलेली तसेच उभी असलेली गहू, हरभरा, कांदा आणि फळबागांवरील पिके धोक्यात आली आहेत. 

अहिल्यानगर-  पारनेर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे कलिंगड, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले. काल सायंकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. गारपीट आणि पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

धाराशिव - धाराशिव तालुक्यामध्ये काल झालेल्या अवकाळी आणि गारपीट पावसामुळे ज्वारी पीक जमीन दोस्त झाले आहे. पावसाने मातीमोल झालेली ज्वारी आता शेतकऱ्यांना विक्री करता येणार नाही त्यामुळे काढणीचा खर्च सुद्धा निघणे कठीण झाले आहे. धाराशिव तालुक्यातील तडवळा गावामध्ये ज्वारीचे पीक आक्के मातीमोल झाले आहेत

छत्रपती संभाजीनगर - वादळी वारा व अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शेती पिकाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गहू, बाजरी, ज्वारी व फळबागायतीला सर्वाधिक फटका बसला. गहू भुईसपाट झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन दिवसापासून सलग अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बी हंगामानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्याचा अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम ही धोक्यात आला आहे.

धुळे - हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे धुळे जिल्ह्यातील साक्री शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांच्या काढलेला गहू हरभरा मका या पिकांचे नुकसान झालं अचानक आलेला पाऊस आणि गारपीटमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

जळगाव -  जळगाव जिल्ह्यातील बोदवड आणि मुक्ताईनगर अशा अनेक भागात मध्यरात्री विजेच्या कडकडासह वादळी वारा आणि पाऊस झाला यामुळे शेतकर्‍यांचं मोठं नुकसान झालं. शेतात उभा असलेला गहू, मका, हरभरा इतर पिक आणि शेतात कापून ठेवलेल्या गहू भिजला आहे. शेतात कापून ठेवलेल्या गव्हाला फटका सर्वाधिक शेतकर्‍यांचा गहू खराब झाला.

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात वातावरणात झालेल्या बदलाचा फटका आंबा, मोहफूल व मका उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना बसला. जिल्ह्यातील काही ठिकाणी तीन दिवसा पासूनच वादळ वारा आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावर्षी आंब्याचे उत्पन्न जिल्ह्यात प्रचंड प्रमाणात होईल असे दिसून येत होते परंतु अचानक आलेल्या वादळंमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून येत आहे. 

बुलढाणा - चिखली तालुक्यात गारपीट सह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे . चिखली तालुकात काल दुपारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाकी तर रात्री सुद्धा मोठा अवकाळी पाऊस झाला . यामुळे शेतातील उभी पिके यांची नुकसान झाले आहे . यामध्ये कांदा, मका , गहू, लसूण भाजीपाला यासह पिकांवर नुकसान झाले.

लातूर - लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या अशी मागणी शेतकरी करीत आहेत. प्रशासनाकडून अद्यापही पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. 30 दिवसांत शेती पिकांना अवकाळी पावसाचा दुसर्‍यांदा फटका बसला आहे.

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात ऐन रब्बी पिके काढनिच्या वेळेत वादळी वारा ,अवकाळी पाऊस/गारपिट झाल्याने ,खरबुज ,टरबूज, अंबा ,ज्वारी या सह रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नागपूर - नागपुरात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण असल्याने गारवा जाणवत होता, आता पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काल विदर्भातील काही भागात गारपीटसह अवकाळी पाऊस झाला होता. आज देखील विदर्भात नागपूर – सह चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

नांदेड- नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील सोनाळा, चाभरा, लिंबगाव, परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसल्याने लाखो रुपयांची शिजवून उघड्या आभाळाखाली वाळत घातलेली हळद भिजून वाया गेली आहे. काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे अर्धापुर तालुक्यातील चाभरा, सोनाळा,खैरगाव,लिंबगाव भागातील शेतीतील केळी,हळद,गहू,ज्वारी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झालंय, सोनाळा येथील काशिनाथ देबगुंडे यांच्या शेतातील 2 एक्कर ज्वारी भुईसपाट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group