राज्यातील हवामानात येत्या २४ तासात मोठा बदल होण्याची शक्यता असून, १७ ते २० मार्च या चार दिवसांच्या कालावधीत तर मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांत कडाक्याचे ऊन आणि उष्णतेची लाट असतानाच, निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. यासोबतच काही भागात उष्णता अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. धाराशिव, बीड, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला.
आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल. जळगाव, वाशिम, चंद्रपूर येथे पारा 40 अंशाच्या पुढे होता. निफाड येथे राज्यातील निचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. राज्यातील काही भागात कडाक्याचे उष्ण आहे तर काही भागात पाऊस हजेरी लावणार आहे. पुढील काही दिवस राज्यात पाऊस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि आता मार्च महिन्यातही पाऊस होत आहे. देशातील अनेक राज्यात पाऊस पडत आहे.