महाराष्ट्रात पाऊस कायम, गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज
महाराष्ट्रात पाऊस कायम, गारपीट आणि वादळी पावसाचा अंदाज
img
वैष्णवी सांगळे
भारतीय हवामान विभागानं राज्यात विविध ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. नाशिक , पुणे , बीड, जालना, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, वाशिम, सिंधुदुर्गमध्ये पावसानं हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असताना अवकाळी पाऊस हजेरी लावतत असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे. तर आज गुरूवारी, 2 एप्रिल रोजी, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची पुन्हा शक्यता आहे. दिवसभर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावासासह गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे.



भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रात 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उपग्रहातील छायाचित्रांमध्ये राज्यावर आणि विशेषतः मुंबई-पुणे परिसरांवर मोठ्या प्रमाणात ढग तयार होताना दिसून येत आहेत. सोमवारच्या वादळी पावसानंतर हे ढग दाटून आल्याचे दिसून येत आहेत. हवामान निरिक्षकांच्या माहितीनुसार, यापूर्वी उत्तर भारतावर दाटलेले ढग आता हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून पश्चिम भारतात सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे.

या ढगांमुळे राज्यातील शहरी आणि डोंगराळ भागात पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह कल्याण-बदलापूर भागांत पावसाची शक्यता कमी असून, पुणे लोणावळामध्ये सर्वाधिक शक्यता आहे. लोणावळा आणि पुण्यातील पश्चिम घाट प्रदेशात येत्या काही दिवसांत पाऊस वाढणार आहे.

दरम्यान, या सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातील पारा खाली उतरला आहे. मार्च महिन्यात चाळीशी गाठलेले तापमान आता 32 ते 33 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बुधवारी अमरावती जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी तापमान 38.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. दरम्यान निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून 17.8 अंश सेल्सिअस इतकं होतं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group