राज्यातील काही भागांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि विदर्भासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसह सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्याला 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील काही ठिकाणीही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कऱण्यात आले आहे.
राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भात कायम आहे. हवामान खात्याने आज संपूर्ण विदर्भासाठीही 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांची काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठवाड्यातील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते हलका पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्राला आज 'ग्रीन अलर्ट' देण्यात आला आहे, म्हणजेच तिथे मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे.