गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन ते चार तासात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
वेळेअगोदरच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले, सोमवारी तळ कोकणात मोसमी वारे पोहोचल्याची वर्दी मिळाली. मान्सूनमुळे राज्यात धो धो पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिकसह राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे.
पुणे-नाशिकमध्ये रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला . तर मुंबईमध्ये सोमवारी सकाळपासून रिपरिप सुरू झाली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील नद्यांची पातळी वाढली आहे.
पुढील 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात सगळीकडे पाणी साचलेय. गावातील ओढे नाले भरून वाहत आहेत.
आज राज्यात अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन ते चार तास मुंबई, पुण्यासह घाटमाथ्यावर अति मुसळधार पाऊस पडेल, असा अशारा हवामान विभागाने दिला आहे.