अमरावती (भ्रमर वृत्तसेवा) :- महाराष्ट्राच्या कविविश्वात विनोदी काव्यसादरीकरणाची वेगळी ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग (वय 68) यांचे आज पहाटे अमरावती येथे दीर्घ आजाराने निधन झाले.
गेल्या काही महिन्यांपासून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते आणि अमरावतीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथे ’ मिर्झा एक्सप्रेस ’ या घरात त्यांचे वास्तव्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी फातेमा मिर्झा, अभियंता मुलगा रमीज, महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत.
विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण 20 काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात त्यांनी आपल्या ’मिर्झा एक्सप्रेस ’ या काव्य मैफिलीचे 6 हजारावर सादरीकरण केले आहे.
वयाच्या अकरा वर्षापासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली होती. 17 सप्टेंबर 1957 चा त्यांचा जन्म. 1970 पासून त्यांनी मंचावर कविता सादर करायला सुरुवात केली. पुढील 50 वर्ष विदर्भ, मराठवाड्यातील कवी संमेलनाचे ते केंद्रबिंदू ठरले. वृत्तपत्रातील विविध स्तंभातून लेखनही त्यांनी केले.
त्यांचा ’मिर्झाजी कहीन ’ हा त्यांचा स्तंभ तुफान लोकप्रिय ठरला होता. त्यांचे 20 काव्यसंग्रह असून मिर्झा एक्सप्रेस या नावाने अफलातून किस्से आणि कवितेचा कार्यक्रम प्रसिद्ध होता. विदर्भातील ख्यातनाम संत फकीरजी महाराज या मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी होते. त्यांचे वडील मिर्झा रज्जाक बेग उर्फ भाईजी हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रभावी राजकीय सामाजिक व्यक्तिमत्व होते.