उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित 'मराठी विजय मेळाव्या'त एकाच व्यासपीठावर हजेरी लावली.
मराठी भाषा आणि अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या या बंधूंनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. या ऐतिहासिक क्षणाला साक्षीदार होण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठीप्रेमी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. ही प्रतिक्रिया देताना शिवसेनेकडून राज ठाकरेंची पाठराखण तर उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आलीय.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर टीका केली. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया देण्यात आली. तसेच शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते.
शिवसेनेचे नेते प्रतिक्रिया देत असताना त्यांच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये राज ठाकरेंना उजवं माप देण्यात आला तर उद्धव ठाकरेंना डिवचण्यात आलयं. 9 विरोधाभास दाखवणारी वाक्य शेअर करण्यात आली असून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा स्वतंत्र सवतासुभा
दुसरा नुसताच आयतोबा!