राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारील मतमोजणी म्हणजे निकाल आहे. पण या महापालिका निवडणुकांच्या मतदानापूर्वीच महायुतीला मोठं यश मिळताना दिसत आहे.
निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण ७० उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक आहे. दरम्यान, याच बिनविरोध विजयी नगरसेवकांबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी विधान केलं आहे. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी मी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते. ही परिस्थिती पहिल्यांदाच मी पाहतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
ठाण्याचे शहराध्यक्ष अविनाश जाधव , अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील आज राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. या भेटीदरम्यान, राज ठाकरेंनी बिनविरोध विजयावरुन वक्तव्य केलं.