राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रीत हिंदी भाषाच्या सक्तीचा निर्णय सरकारने मागे घेतल्यानंतर आज दोन्ही ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्र विजयी मेळावा होता आहे.
आज ५ जुलै २०२५ रोजी मुंबईतील वरळी परिसरातील डोम सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत जनतेला या मेळाव्याचे निमंत्रण दिले आहे. सकाळी सुरु होणाऱ्या या मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरात ‘आवाज मराठीचा’ असा संदेश देत बॅनरबाजी करण्यात आली आहे.
या मेळाव्यासाठी व्यासपीठ, एलईडी लाईट, एलईडी स्क्रीन, कार्यकर्त्यांची आसन व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वरळीतील डोम सभागृहातील व्यासपीठावर महाराष्ट्राचा नकाशा पाहायला मिळत आहे.
तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी खास आसन व्यवस्था आणि स्क्रीनही लावण्यात आले आहे. या मेळाव्याला केवळ मुंबईतूनच नव्हे, तर महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अनेक शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईच्या वेशीवर पोहोचले आहेत.
कार्यकर्ते ढोल-ताशांच्या गजरात सहभागी होणार
तसेच ठाकरे आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र घोषणाबाजी करत मेळाव्यात सहभागी होताना दिसत आहेत. ठाण्यातील ठाणे नगर भागातही मराठी एकजुटीचा नारा देत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पुण्यातील कात्रजमधून शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे कार्यकर्त्यांसह मेळाव्यासाठी निघाले आहेत.
मनसेचे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी आणि प्रवक्ते हेमंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते पारंपरिक पोशाखात आणि कोळी बँडसह ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कांदिवलीहून ट्रेनने निघाले आहेत. तर कल्याणहून मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्ते एकत्र येत ढोल-ताशांच्या गजरात मुंबईतील विजयी मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
या मेळाव्याला कोणत्याही पक्षाचा झेंडा न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सर्वच पक्षांच्या नेत्यांना आणि मराठी प्रेमींनी एकत्र येता येईल. तसेच या उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रत्येक मराठी प्रेमी, साहित्यकार, लेखक, कवी, शिक्षक, संपादक आणि कलाकारांना आमंत्रित करण्यात आले आहे.
वरळीतील डोममध्ये जय्यत तयारी
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी आयोजित केलेल्या डोम या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ सहभागी पक्षांचे अध्यक्ष, प्रमुख किंवा प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
वरळी डोममध्ये जवळपास ७ ते ८ हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
डोमच्या हॉलमध्ये, बाहेर आणि रस्त्यावरही एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून अधिक लोक मेळावा पाहू शकतील.
वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये ८०० गाड्यांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे.
वरळी डोमसमोर तटीय रस्त्याच्या पुलाखाली दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महालक्ष्मी रेसकोर्स येथे बसेस आणि बाहेरून येणाऱ्या मोठ्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
राजकीय समीकरणे आणि आगामी महानगरपालिका निवडणुका