मुंबईत महाविकास आघाडी आणि मनसे यांनी 'मतदार याद्यांमधील घोळ' आणि 'मतचोरी' विरोधात 'सत्याचा मोर्चा' आयोजित केला आहे. या मोर्चात उद्धव ठाकरे , राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यासह प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. हा मोर्चा फॅशन स्ट्रीटपासून सुरू होऊन मुंबई महानगरपालिका मुख्यालयावर धडकणार आहे, जिथे नेत्यांची भाषणे होतील.
दरम्यान, या मोर्चासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकलने चर्चगेटसाठी रवाना झाले आहे. आधीच घोषित केल्या प्रमाणे अनेक वर्षांनंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला आहे. राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास पश्चिम रेल्वेच्या लोकलने केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हेही उपस्थित होते.
दरम्यान, या प्रवासावेळी राज ठाकरेंना विंडो सीटवर बसून प्रवासाचा आंनद घेतलाय. तर प्रवासापूर्वी जवळ जवळ १५ मिनिटे राज ठाकरे हे दादर रेल्वे स्थानकावर लोकलची वाट पाहत उभे होते. यावेळी त्यांनी काही प्रवाशांना ऑटोग्राफ देखील दिला. यावेळी त्यांना भेटण्यासाठी प्रवशांची मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.
तर एका प्रवाशाला राज ठाकरे यांनी रेल्वे तिकिटावर ऑटोग्राफ दिला आहे. तर हा ऑटोग्राफ फ्रेम करून ठेवणार, अशी प्रतिक्रिया या प्रवाशाने दिली आहे.
या मोर्चासाठी BMC मुख्यालयाबाहेर स्टेज उभारणीचे काम सुरू असून, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा होऊ लागले आहेत. आंदोलकांच्या दाव्यानुसार, या मोर्चाला लाखो कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.