हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गट हे दोन्ही पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंदी सक्तीला विरोध करत दोन्ही पक्षांनी आंदोलन आणि मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली होती.
हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले असून ते एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती पण याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. पण आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ठाकरे बंधूंचा एकच त्मोर्चा निघेल असं सांगितले आहे.
त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ५ जुलैला ठाकरे बंधू मोर्चाद्वारे महाराष्ट्र दणाणून टाकणार असल्याचे दिसून येत आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित मोर्चाबाबत माहिती दिली.
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित फोटो पोस्ट केला. या फोटोवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! जय महाराष्ट्र!' संजय राऊत यांनी ही पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील टॅग केले आहे.
गुरूवारी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत मनसेने हिंदी सक्तीविरोधात ५ जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गट ७ जुलै रोजी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहिती समोर आली होती. आता त्याला दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिला आहे.
संजय राऊत यांनी ट्वीट करत एकत्र मोर्चा निघणार असल्याचे जाहीर केले. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील नुकताच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र मोर्चा निघणार असल्याचे सांगितले. या मोर्चाद्वारे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे त्यांची युती होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.