मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोघेही एकत्र येत असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली आणि अत्यंत भावूक होत एक ऐतिहासिक विधान केलं – “राज-उद्धव एकत्र आले की मी मरायला मोकळा, स्वर्गात जाऊन बाळासाहेबांना सांगेन.”
राजकारणात अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. शनिवारी मुंबईत होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र मंचावर येणं हे एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. या आधी दोघे अनेक वर्षांपासून राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या मार्गाने चालत होते.
प्रकाश महाजन यांनी दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर मला मरण आलं तरी चालेल. मी स्वर्गात जाऊन बाळासाहेबांना सांगेन की त्यांच्या दोघा मुलांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी ऐक्य केलं आहे.”
महाजन पुढे म्हणाले, “हा क्षण बाळासाहेबांनी पाहायला हवा होता. मी आज समाधीपाशी त्यांनाच ही गोष्ट सांगण्यासाठी आलो आहे. उद्याचा मेळावा पाहून मरण आलं तरी खंत नाही.” त्यांनी दोन्ही नेत्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करत सांगितलं की, “राजसाहेब हे जळजळते निखारे आहेत, तर उद्धवजी शीतलतेचा सागर आहेत.”
प्रकाश महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही आभार मानले आणि त्यांचा उल्लेख करत सांगितले की, “राजसाहेबांच्या सभेला गर्दी होते आणि उद्धवजींच्या सभेतील गर्दी मतात बदलते, हे पवारसाहेबांनीच सांगितलं होतं. आता ही दोन्ही ताकदी एकत्र येणार आहेत.”
महाजन पुढे म्हणाले, “दोन सिंह एकत्र येऊ नयेत म्हणून कोल्हेकुई सुरू आहे. पण आता ब्रह्मदेवही उतरला तरी ही युती तोडू शकणार नाही.” त्यांनी हेही स्पष्ट केलं की, ही युती केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून ती मराठी माणसासाठी हक्काचं ठिकाण ठरणार आहे.