मुंबई : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनंतर एकत्र आले. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर आयोजित विजय मेळाव्यात मराठी माणसांची तुडुंब गर्दी पाहायला मिळाली.
वरळी डोमच्या सभागृहात आणि बाहेर तुफान गर्दी होती. या सोहळ्यात लोकांची रेटारेटी पाहायला मिळाली. राज्यभरातील राजकीय पक्षातील कार्यकर्ते आणि सामजिक कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली.
मात्र, वरळीतील हा मराठी माणसांचा विजय मेळावा पार पडल्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबईच्या वरळीतील विजय मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासहित राज ठाकरेंनी उपस्थितांना संबोधित केलं. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांसहित मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली.
हजारो मराठी लोकांचा मेळावा पार पडल्यानंतर राज ठाकरेंनी भाषणात एक उल्लेख राहून गेल्याने सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त केली.
नेमकी काय पोस्ट ?
राज ठाकरे म्हणाले, 'हिंदी सक्तीच्या बाबतीत मराठी माणसानं सरकारला झुकवलं. त्यानंतर आज मुंबईत मराठी माणसांचा विजयी मेळावा झाला. या मेळाव्यात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला. त्याबद्दल आधीच दिलगीरी व्यक्त करतो'.
'हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी वृत्तवाहिन्या, मराठी वर्तमानपत्रं, मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, अनेक दबावगट, तसेच काही मोजके कलाकार हे या लढ्याच्या वेळेस ठाम उभे राहिले त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि आभार. मराठी अस्मितेसाठी ही झालेली एकजूट अशीच कायम राहील. पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचे मी आभार मानतो, असेही राज ठाकरे म्हणाले.