दसरा हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण असून यादिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. हिंदू पंचांगानुसार आश्विन शुक्ल दशमीचा हा दिवस होता. या तिथीला विजयादशमी असंही म्हटलं जातं. यादिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा केली जाते. दसरा हा चार मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. हा दिवस सर्व कामांसाठी शुभ मानला जातो.

दसरा हा महाराष्ट्राच्या राजकारणात एका विशेष कारणामुळे प्रचलित असतो. हे कारण म्हणजे दसरा मेळावा. उद्धव ठाकरे , पंकजा मुंडे , राज ठाकरे , मोहन भागवत यांचे दसरे मेळावे दरवर्षी चर्चेत असतात. दादरच्या शिवाजी पार्क मैदानात गुरुवारी उद्धवसेनेचा सायंकाळी ५ वाजता तर गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या शिंदेसेनेच्या सायंकाळी ६ वाजेच्या दसरा मेळाव्यांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यांतून दोन्ही पक्षांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.
शिंदेसेनेचा मेळावा सुरुवातीला आझाद मैदानात होणार होता, मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने तो नेस्को सेंटरमध्ये घेण्यात येणार आहे. दुसरीकडे, चिखल आणि पाणी साचले असले तरी उद्धवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. ‘शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची’, अशा घोषवाक्यासह उद्धवसेनेने नवीन टीजर प्रसिद्ध केला आहे. त्यात नव्या दमाची ठिणगी असे म्हणत आदित्य ठाकरेंच्या भाषणाचे काही अंश समाविष्ट केले आहेत.
त्यामुळे आगामी निवडणुका आदित्य यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार असल्याचा संदेशही मेळाव्यापूर्वी देण्यात आला आहे. दरम्यान नाशिकहून ठाकरे सेनेचे तसेच शिंदे सेनेचे कार्यकर्ते दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.