राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. नावात काय आहे? असं म्हणतात, पण नावात बरंच काही असतं, हे राज्यातील सत्तासंघर्षाच्या राजकीय नाट्यात पाहायला मिळालं. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कधीकाळी उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेला शिवसेना हा मूळ पक्ष आणि अजित पवारांकडे कधीकाळी शरद पवार अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरेंकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शरद पवारांकडे आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपण राजकीय पक्षांच्या नावाचा वाद पाहिला आहे. पण, लोकसभा सचिवालयानं कार्यालयांचं वाटप करताना पक्षांच्या नावाचा जो उल्लेख केल्या, त्यावरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये मागील काळात ऐतिहासिक फूट पडली आणि दोन्ही पक्षांमधून आणखी दोन नवे पक्ष उदयास आले. आधी शिवसेनेत बंड झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हा मूळ शिवसेना असल्याचं सांगत पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे यांना दिलं. तर नंतर राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार यांना देण्यात आलं.
मात्र लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर या दोन्ही पक्षांना धक्का बसला आणि शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील नव्या पक्षांनी दमदार कामगिरी केली. या कामगिरीचा परिणाम आता लोकसभेत पाहायला मिळत असून लोकसभा सचिवालयाने कार्यालयांचं वाटप करताना शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा केला आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केला आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव दिलं होतं. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाने आठ जागांवर विजय मिळवला, तर अजित पवारांच्या पक्षाला अवघ्या एका जागेवर यश मिळालं.
नुकतंच लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप करण्यात आले. हे वाटप खासदारांच्या संख्येच्या आधारे करण्यात आल्याने शरद पवार यांच्या पक्षाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस असा करण्यात आला, तर अजित पवार यांच्या पक्षाला कार्यालयही मिळू शकलं नाही.
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने नेते आमच्या पक्षाचा उल्लेख शिवसेना असाच करावा, यासाठी आग्रही असतात. मात्र लोकसभा सचिवालयाने त्यांना कार्यालय देताना त्यांचा उल्लेख शिवसेना शिंदे असा केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, लोकसभेत नऊ खासदार असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही लोकसभा सचिवालायाकडून स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेलं आहे.