मोठी बातमी : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक
मोठी बातमी : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला अटक
img
Dipali Ghadwaje
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण उसाच्या शेतात लपून बसला होता. ऊस खाऊन आणि घोड्यांना दिले जाणारे पाणी पिऊन तो ५ दिवस शेतात लपला होता. पोलिसांनी या तरुणाच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत नीलकंठेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनावर बसलेला एक प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुतळा आहे. २७ जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत शिवरायांच्या पुतळ्याचे नुकसान केले होते. 

या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या तरुणाला शोधण्यासाठी यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. तपास सुरु असताना आज (३१ जुलै) संबंधित तरुण यवतमधील एका ऊसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले.

दारूच्या नशेमध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आरोपीने केलेल्या कृत्याची कबुली दिली. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु असल्याचे यवत पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group