तलवारवाला बाबा म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज यांनी शिर्डीचे साईबाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.
या प्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या तलवारबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संत युवराज महाराज यांनी नुकताच साईबाबांबाबत वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार , देशभरातील हिंदू मंदिरातील साईबाबांच्या मूर्ती हटवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 'काही हिंदू मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती आहेत.
देशभरात ठिकठिकाणी साईबाबांची मंदिरं आहेत. सगळीकडे गल्ली गल्लीत साईंची मंदिरं आहेत. हिंदुंना काय झाले आहे. जुलैमध्ये या सर्व साईबाबांच्या मूर्ती हटवून टाका.'
तसंच, 'साईबाबांच्या मूर्तींना हातोड्याने तोडून गटारामध्ये टाका. नदीमध्ये मूर्ती टाकून ती परत मिळेल असं करू नका. प्रत्येक मंदिरातून या मूर्ती हटवला. जर तुम्ही मूर्ती हटवल्या नाही तर आम्ही जबरदस्ती त्या हटवू. हे अभियान आम्ही फरिदाबाबमधून सुरू केले आहे. साईबाबा मुस्लिम होते ते मांसाहारी होते आणि व्यभिचारी होते. साईबाबा देव नाही. त्यांच्याशी आपला काहीच संबंध नाही.', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
संत युवराज यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
साईबाबांची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. व्हायरल व्हिडिओनंतर शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.