शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये चड्डी बनियनवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली.
दरम्यान आमदार निवासातील हल्ला प्रकरणातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात आज विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार आंदोलन केलं.
या आंदोलनात विरोधकांनी “चड्डी बनियन गँग हाय हाय”, “गुंडाराजचं करायचं काय?”, “खाली डोकं वर पाय” अशा घोषणा देत महायुती सरकारवर सडकून टीका केली.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सतेज पाटील यांच्यासह नेते टॉवेल आणि बनियन घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरले होते. संजय गायकवाड यांच्या कृतीचा निषेध करत, त्यांनी शासनाच्या “गुंडशाही कारभाराविरोधात” संतप्त घोषणाबाजी केली.
या आंदोलनात “महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियनचा धिक्कार असो” असा बॅनर लावण्यात आला होता, तर संजय गायकवाड यांचा बॉक्सिंग अवतारमधील फोटो देखील ठळकपणे लावण्यात आला होता. विरोधकांनी हे आंदोलन विनोदी अंगाने सादर करत सरकारची निर्भत्सना केली.
नेमकं काय घडलं होत?
संजय गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी आमदार निवासात चड्डी बनियन घालून डॉक्टरला मारहाण केली होती, त्या घटनेवरून आता संपूर्ण महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे.