अनेकदा मुलांना आईने केलेली भाजी आवडत नाही. त्यामुळे अनेक मुलं उपाशी राहतात किंवा दुसरी भाजी करण्यास सांगतात. मात्र नागपुरात एक धक्कादायक घटना घडली आहे.
आईने भेंडीची भाजी केली होती, मात्र मुलाला भेंडीची भाजी आवडली नाही, त्यामुळे त्याने भाजी खाण्यास नकार दिला. त्यामुळे आई त्याच्यावर रागावली आणि याच कारणामुळे मुलाने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे समोर आले आहे.
भेंडीची भाजी न खाल्ल्यामुळे आई मुलाला ओरडली होती, मात्र त्यामुळे राग आल्याने मुलगा चक्क घर सोडून दिल्लीला गेल्याची घटना घडली आहे. हा मुलगा आई ओरडल्यानंतर घरातून बाहेर पडला आणि ट्रेनने दिल्लीला गेला. नागपुरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेने पोलिसही चक्रावले असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाची आई नेहमी भेंडीची भाजी करायची. त्यामुळे बऱ्याचदा त्याचं आई सोबत भांडण होत असायचं. अकरा तारखेच्या रात्रीही भेंडीची भाजी केल्यामुळे दोघाचे भांडण झालं. भाजी न खाल्ल्यांमुळे त्याची आई रागावली.
यानंतर रागाच्या भरात या मुलाने चक्क घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तो रागात रेल्वे स्टेशनला गेला आणि दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेत बसला. काही तासांनी तो दिल्लीत पोहोचला.
घर सोडल्यानंतर त्याने स्वतः जवळचा मोबाईलही स्विच ऑफ केला. त्यामुळे पालकांना त्याचा शोध घेता आला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडेही शोध घेतला मात्र तो सापडला नाही, शेवटी पालकांनी पोलिसात तक्रार दिली. कोतवाली पोलिसांनी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे संवेदनशीलता दाखवत तात्काळ शोध मोहीम राबवली.
सायबर विभागाने त्याच्या डिटेल्स तपासल्यानंतर तो दिल्लीला गेल्याचे समजलं. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या दिल्लीतील मित्राशी संपर्क साधला, त्यावेळी तो दिल्लीत असल्याचे समजले.
यानंतर पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेलं आणि त्या मुलाला नागपुरात आणण्यात आलं. यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यानंतर पालकांनी पोलिसांचे आभार मानत कृतज्ञ भावना व्यक्त केली.