रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ते हा प्रश्नच अनेक रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून पडतो. या खड्डयांमुळे अनेकांचा नाहक बळी गेला आहे. नागपूर मध्येही खेळायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू खड्ड्यात बुडून झालाय. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील पाचगाव येथे ही दुर्दैवी घटना घडली.
खैरी बिजेवाडा पाचगाव येथील रहिवासी सात वर्षीय उत्कर्ष लोकेश लांजेवार आणि रिधान संजय सहारे दोघेही दुपारी शाळेतून घरी परतले. सायंकाळी जेवण केल्यानंतर खेळायला घराबाहेर गेले. दिवसभर पाऊसाच्या सरीमुळे खड्ड्यात पाणी साचले होते. दोघांना त्या खड्ड्याचा अंदाज आला नाही आणि पाणी खेळण्यासाठी पायातील चप्पल बाहेर काढून खड्ड्यात उतरले.
खड्डा खोल असल्याने त्या दोन्ही मुलांचा बुडून मृत्यू झाला. खेळायला गेलेली मुले परत आली नसल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. घराच्या काही अंतरावर खड्ड्याजवळ दोन्ही मुलांच्या चपला दिसून आल्या. एकाने खड्ड्यात उतरून पाहिले असता पाण्याखाली एक मुलगा आढळून आला तर आणखी शोध घेतला असता दुसऱ्या मुलाचा मृतदेह दिसून आला. मुलांना बघून कुटुंबियांनी हंबरडा फोडला.