राज्य सरकारनं सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. या योजनेअंतर्ग पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात यायला देखील सुरुवात झाली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पहिल्या टप्प्यात राज्यातील 1 कोटी महिलांना लाभ मिळणार आहे. तर नागपूर जिल्ह्यात 5 लाख महिलांना याचा फायदा होणार असून, ही योजना सुरुच राहणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यलयात पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर, नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. यावेळी फडणवीस बोलत होते.
लाडकी बहिण योजनेतून महिलांना 1500 रुपये यायला सुरुवात
अनेक शुर विरांनी बलिदान देत भारताला स्वातंत्र्य मिळवूनं दिलं असल्याचे फडणवीस म्हणाले. भारत हा सध्या जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था असणार देश आहे. भारताचा हा थक्क करणारा प्रवास असल्याचे फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त मी स्वातंत्र्य सैनीकांना अभिवादन करतो असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसीत भारत अशी थीम ठेवली आहे असं ते म्हणाले. समृद्धी महामार्ग, विकासाचे अनेक प्रकल्प, 50 हजार कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक हे विकास दर्शवणारं चित्र असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच लाडकी बहिण योजनेतून महिलांना 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे. कालपासून पैसे द्यायला सुरुवात झालीय. राज्यात एक कोटी महिलांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळेल असे फडणवीस म्हणाले.