लाडकी बहीण योजना सुरु झाली आणि अनेक महिलांना त्याचा मोठा लाभ झाला. पण या योजनेत अनेक गैरप्रकार देखील झाल्याचं पहायला मिळालं. जसे की महिला म्हणून पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला. काही निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडला. आता सरकार या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा या योजनेसंदर्भात काही निकष तयार करण्यात आले होते. ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्याच कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता, तसेच ज्या महिलांचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं होतं. मात्र या निकषात न बसणाऱ्या देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, ज्या महिलांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे, तसेच ज्या महिलांकडे सरकारी नोकरी आहेत, त्यातील काही महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे.
आता या संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फसवणूक केली त्यांच्यावर सरकार कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे. लाडकी बहीण योजने अंतर्गत अनधिकृत लाभ घेतलेल्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून खात्यांची माहिती मागवण्यात आली आहे, या मध्ये ज्या महिला दोषी आढळतील, त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली जाण्याची शक्यता आहे, तसेच संबंधितांवर गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.