मोठी बातमी ! ''या''  लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? आदिती तटकरेंनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
मोठी बातमी ! ''या'' लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? आदिती तटकरेंनी केलं स्पष्ट, वाचा सविस्तर
img
दैनिक भ्रमर
राज्यातील बहुचर्चित माझी लाडकी बहीण योजेनवरून अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ पाहायला मिळाला. दरम्यान,आता मात्र या योजनेत मोठा ट्विस्ट आला आहे. लाडकी बहीण योजनेतील तब्बल ८ लाख महिलांना आता १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत. आता या ८ लाख महिला नेमक्या कोण, त्यांना फक्त ५०० रुपयेच का दिले जाणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता यावर महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.

अदिती तटकरे यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये अदिती तटकरे यांनी राज्यातील विधानसभा अधिवेशनातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कोणत्या लाडक्या बहिणीला फक्त ५०० रुपये दिले जाणार याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे.

दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे. त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे.

एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आले नसून, सदर प्रक्रियेत दिनांक ३ जुलै २०२४ नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून विधिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद आहे. तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सातत्याने अपप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रशासकीय आकलन कच्चे आहे, किंवा योजनेच्या देदीप्यमान यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. विरोधकांच्या या अपप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी बळी पडणार नाहीत ही मला खात्री आहे, असे अदिती तटकरेंनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेतील अटीनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. प्रधानमंत्री सम्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जाते. यानंतर महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून वार्षिक ६००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. तर केंद्र शासनाद्वारे ६००० म्हणजेच एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना दिले जातात.

यानुसार सध्या ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना दर महिना १००० रुपये दिले जात आहेत. त्यामुळे आता ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचे १५०० रुयपांऐवजी फक्त ५०० रुपये दिले जाणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group