महायुती सरकारने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळाला असून या योजनेवर विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली. दरम्या, या योजनेच्या निकषांमध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण सात हाफ्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. तसेच आता फेब्रुवारीचा हाफ्ता वितरणाला देखील सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करण्यात आली तेव्हाच, या योजनेसाठी काही निकष तयार करण्यात आले होते.
मात्र ज्या महिला या निकषात बसत नाहीत अशा महिलांनी देखील या योजनेसाठी अर्ज केले. या योजनेचा लाभ देखील घेतला. मात्र जेव्हा ही गोष्ट सरकारच्या लक्षात आली तेव्हा अशा महिलांना ज्या या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांचं नाव वगळण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत पाच लाख अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, तसेच ही योजना बंद पडणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली.
यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींच्या विरोधात जाणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणींनी जोडा दाखवला, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला आहे. ते गोंदियात बोलत होते.