लाडकी बहीण योजना ही नेहमी चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेवरुन अनेकदा विरोधी पक्षनेते आरोप करत असतात. नेहमी लाडकी बहीण योजनेचा हप्ता यायला उशिर होत असल्याने महिलांनाही त्रास सहन करावा लागतो.
मंत्री दत्ता भरणे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. या योजनेमुळे विकास निधी मिळण्यास उशीर होत असल्याचे दत्ता भरणे यांनी म्हटले आहे. छगन भुजबळ यांनी योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली दिली आहे. याआधीही लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी मिळण्यासाठी विलंब होत असल्याचे म्हणत अनेकांनी खंत व्यक्त केली होती.
पुण्यात लक्ष्मीबाई स्मृती पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये अमृता फडणवीस यांच्या हस्ते लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले. योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येत असल्याचे अमृता फडणवीस यांनीही मान्य केले.
'लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे. पण ही योजना बंद होणार नाही. लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार आर्थिक ताण सहन करायला तयार आहे. मध्यंतरी काहीतरी फिल्टरेशन करावे लागेल', असे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले.