राज्यातील गोरगरीब महिलांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून सरकारने लाडकी बहीण योजना सशर्त लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेचा असंख्य बहिणींना लाभ झाला. मात्र ही सशर्त होती. काही अटी टाकून महिलांना या योजनेचा लाभ मिळणार होता मात्र अनेक महिलांनी या योजनेचा निकषाबाहेर असतानाही लाभ घेतला. ज्यामुळे सरकारची फसवणूक झाली.
सरकारने अनेक आवाहने केल्यानंतरही अनेकींना अर्ज मागे घेतला नाही. शेवटी सरकारला कठोर पावलं उचलली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्यावर पहिली कारवाई करण्यात आली आहे. सरकारने संबंधित महिलांकडून संपूर्ण रक्कमच वसूल केली आहे. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यात शासकीय कर्मचारी असताना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शासनाकडून महिला आणि बालकल्याण विभागाला विविध विभागात कार्यरत असलेल्या १९६ कर्मचाऱ्यांची यादी प्राप्त झाली होती. या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता १९० कर्मचारी हे अर्धवेळ आणि अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे आढळल्याने ते पात्र ठरले आहेत.
तर उर्वरित ६ शासकीय कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत घेतलेल्या लाभाची प्रत्येकी १६ हजार ५०० असे एकूण ९९ हजार रुपये रक्कम वसूल करण्यात आली आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शासनाची फसवणूक करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे या कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. महिला आणि बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रमोद येंडोले यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.