मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय बनली आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांकडून अनेक टीका करण्यात आली. दरम्यान आता पुन्हा एकदा या योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर राज्याच्या तिजोरीवर भार आल्याचं वक्तव्य सरकारमधील अनेकांनी आत्तापर्यंत अनेकदा केलं आहे. ही योजना बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सरकारतर्फे वारंवार स्पष्ट केलं आहे. आता पुन्हा महायुतीमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेसंदर्भात वक्तव्य करत महत्वाचे अपडेट्स दिले. त्यामुळे ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा आला आहे, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला आहे.
काय म्हणाले दत्तात्रय भरणे ?
लाडक्या बहिणी योजनेमुळे सध्या तिजोरीवर बोजा पडत आहे. तरी शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाहीये, याबाबत होत असलेली टीका योग्य नाही, असे राज्याचे अल्पसंख्यांक व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी बद्दल अजित दादांनी भूमिका मांडली आहे ती सरकारची भूमिका आहे,असे ते म्हणाले.
आजची परिस्थिती अवघड पण…
आजची परिस्थिती अवघड आहे मात्र पुढे काय होईल हे सांगता येत नाही. शेतकरी आणि लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याचे चर्चा सुरू आहे, मात्र असे काही होणार नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केलं. लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये दिले जाणार असून तीही योजना बंद होणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
सध्या राज्याच्या अर्थव्यवस्थेवर थोडा ताण असल्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असं भरणे म्हणाले.