महायुती सरकारने राज्यात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. दरम्यान विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. तसेच, महायुती सरकार जर सत्तेत आले तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती, दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं. दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच डिसेंबरचा हफता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे.
डिसेंबरच्या हफत्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली आहे, आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हफत्याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते, परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते, काही महिलांना एक -दोन महिन्यांचेच पैसे मिळाले, अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडले आहेत, अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. मात्र डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. तसेच 2100 रुपयांचा हफ्ता देखील या वर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे, पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये ऐवजी 2100 रुपये जमा होऊ शकतात. ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.