गरजू महिलांना आर्थिक मदत मिळावी या हेतूने राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. ज्या योजनेचा अनेक गरजू महिलांना फायदा झाला. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निकष लावले होते जेणेकरून गरजू महिलांनाच याचा लाभ मिळेल. मात्र निकषाबाहेर जाणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन सरकारची फसवणूक केली. ज्यामुळे शासनाची आर्थिक लूट झाली. हीच बाब लक्षात घेता सरकारने आता या अपात्र लाभार्त्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
लाडकी बहीण योजनेत ८ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे. ही रक्कम जवळपास १५ कोटी आहे. हे पैसे आता त्यांच्याकडून वसुली करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून वसुली करण्याचे आदेश वित्तविभागाने दिले असून या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. ८ हजार अंगणवाडी सेविकांकडून १५ कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. या महिलांनी मागील १ वर्षांपासून दर महिन्याला १५०० रुपयांचा लाभ घेतला आहे.
एक वर्ष आणि दोन महिने त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यातून जवळपास त्यांनी २१००० रुपयांचा लाभ घेतला आहे. त्यानंतर आता बोगस लाभार्थ्यांची छाननी सुरु केली आहे. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला आहे.लाडकी बहीण योजनेत निकषानुसार अडीच लाख उत्पन्न असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणा आहे. अशातच सरकारी कर्मचाऱ्यांकडून शासनाची फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे.आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्या वेतनातून हे पैसे वळते केले जाणार आहे. त्यांच्या वेतनातून टप्प्याटप्प्याने पैसे वसूल केले जावेत, यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागासोबत चर्चा सुरु आहे.