राज्यातील १ कोटी लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सरकारने e-KYC करण्यास सांगितले होते. त्यानुसार १८ नोव्हेंबर ही e-KYC साठी शेवटची तारीख होती. मात्र अनेक महिलांना e-KYC करण्यास काही ना काही अडथळा येत होता.
१ कोटी महिलांची e-KYC बाकी होती एका दिवसात हे शक्य नसल्याने मुदतवाढीची अपेक्षा लाडक्या बहिणींकडून होत होती त्यानुसार आता e-KYC साठी मुदतवाढ मिळाली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.
आदिती तटकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC मुदतवाढ !
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.
परंतु, गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.
या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.