लाडकी बहीण योजना महाराष्ट्र मध्ये चालवली जाणारी सर्व महत्वकांक्षी योजना ठरली आहे या योजनेमध्ये लाभार्थी महिलांना प्रति महिना 1500 रुपये मिळत आहे.
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली आहे. जुलै 2023 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून, या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ताही लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.
‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही निकष निश्चित केले आहेत. मात्र, या निकषांमध्ये बसत नसतानाही अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता सरकार अशा महिलांच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी करणार आहे.
ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता आहे. या योजनेबाबत सुरू असलेल्या उलटसुलट चर्चांवर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“लाडकी बहीण योजना गेल्या जुलैपासून सुरू झाली आहे. तेव्हापासून वेगवेगळ्या स्तरावर या योजनेचे क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यात येत आहे. गेल्या महिन्यातदेखील या योजनेत काही डिफॉल्टर्स आढळून आले. जे लाभार्थी या योजनेत बसत नाहीत, त्यांना वगळण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘या’ महिलांना योजनेतून वगळणार
ज्या महिलांनी योजनेसाठी दोनवेळा अर्ज केला आहे किंवा ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे, अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. दर महिन्याला या योजनेच्या निकषांमध्ये बदल होत असतो. त्यामुळे योजनेचे सातत्याने क्रॉस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे, असेही त्या म्हणाल्या.
आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या महिला ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निकषांमध्ये बसत नाहीत, त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, या महिलांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.